मुंबई : मुंबईच्या रस्त्यांवर धावून धावून थकलेल्या भागलेल्या तब्बल १२० डबल डेकर बसेस भंगारात निघणार आणि कायमच्या इतिहासजमा होणार या बातमीने अस्वस्थ झालेल्या मुंबईप्रेमींसाठी नवे वर्ष आनंदवार्ता घेऊन आले आहे. या जुन्या डबल डेकर बाद करण्याची प्रक्रिया सुरू करतानाच नव्या डबल डेकर बसेसची ऑर्डर देण्याच्या निर्णयाप्रत बेस्ट प्रशासन आले आहे. नव्या डबल डेकर खरेदी करण्यास बेस्ट प्रशासनाने तत्वत: मान्यता दिल्याचे सूत्रांनी सांगितले. सध्या बेस्टकडे १२० डबल डेकर आहेत. त्यातील ७० डबल डेकर जून २०२० आणि मार्च २०२१ पर्यंत बाद केल्या जातील. ज्यांचे आयुष्य १४ वर्षे आहे अशाच डबल डेकर बाद होतील.डबल डेकर कायमची जाणार हे समजताच असंख्य मुंबईकरांनी बेस्टच्या हेल्पलाईनवर फोन करून या बसेस वाचवा म्हणून साकडे घातले. या बसेस म्हणजे प्राचीन मुंबईचा एक भाग असल्याचे त्यांचे म्हणणे होते. हे साकडे जणू बेस्टने ऐकले आहे. एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला ५० डबल डेकर बसेस खरेदी करण्याची ऑर्डर दिली जाईल. त्यावेळी जुन्या डबलडेकरचा एक जथ्था बाद झालेला असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नरीमन पॉईट, वांद्रे स्टेशनकुर्ला स्टेशन ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स अशा मार्गावर अधिकाधिक प्रवासी घेऊन जाण्यासाठी डबल डेकरसारखा दुसरा पर्याय नाही.
मुंबईत दाखल होणार नव्या डबल डेकर